महाविक्रमी महामोर्चा

रणरागिणींचाही खांद्याला खांदा :
शिस्तीने घालून दिला आदर्श
नागपूर : धंतोली येथील यशवंत स्टेडियम येथून निघालेला मोर्चा दुपारी १.३० वाजता टी-पॉइंट येथे पोहोचला आणि दुपारी २.३० वाजता राष्ट्रगीताने समारोप झाला. समाजातील युवती व महिलांच्या हाती मोर्चाचे नेतृत्व सोपवून मराठा-कुणबी समाजातील जनसागर नि:शब्द आणि शिस्तबद्धरीत्या रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले.सकाळी ९ वाजे पासूनच यशवंत स्टेडियमवर मराठा-कुणबी बांधव जमण्यास सुरुवात झाली होती. जागोजागी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. प्रत्येक ठिकाणी शिस्त दिसून येत होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व जिजाऊ वंदना झाल्यानंतर काही तरुणींनी कोपर्डी येथील दुर्दैवी घटना आणि ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याचा दुरुपयोग यावर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कोपर्डीच्या घटनेतील पीडित मृत मुलीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि दुपारी १२.१५ वाजता मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मराठा-कुणबी क्रांती मूक मोर्चाचे बॅनर हातात घेऊन पाच तरुणींनी नेतृत्व केले. त्यांच्या पाठीमागे विद्यार्थिनी, नंतर महिला, वकील, डॉक्टर, युवक आणि शेवटी ज्येष्ठ नागरिक अशा शिस्तबद्ध क्रमात हा मोर्चा निघाला. सोबतच यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील अनेक आमदार सुद्धा सहभागी झाले होते.मोर्चा यशवंत स्टेडियम येथून निघाल्यानंतर पंचशील चौक, लोकमत चौक, रहाटे कॉलनी, पुन्हा लोकमत चौक, झांशी राणी चौक आणि व्हेरायटी चौकमार्गे टी-पॉइंट येथे पोहचला.येथे तयार करण्यात आलेल्या मंचावर छत्रपत्ती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तरुणींनी पुष्पहार अर्पण करीत ‘जय जिजाऊ, जय शिवराज’ चा गजर केला. दरम्यान मोर्चेस्थळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत पोहोचले. यानंतर सात तरुणींचे शिष्टमंडळ निवेदनासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते सोबत घेऊन गेले.या शिष्टमंडळात ऋतुजा मोहिते रंजना बनाफर, जयश्री भुईभार, हिमानी भालतिलक, अंकिता भांडवलकर व वैष्णवी डाफ यांचा समावेश होता.या मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे धावणारे नागपूर काही तासांसाठी शांत झाल्यासारखे वाटत होते. मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.विशेष म्हणजे स्वयंसेवकांनीही व्यवस्था चोखपणे हाताळली. या राज्यव्यापी मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी राजे,आ. नारायण राणे, आ. आशिष शेलार, आ. भाई जगताप, आ. आर.टी. देशमुख, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री रणजित देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, आ. नीतेश राणे, माजी खासदार जांबुवंतराव धोटे, आ. आशिष देशमुख, आ. संध्यादेवी कुपेकर,दीपिका चव्हाण, मकरंद पाटील, संजय कदम, विनायक मेटे, चित्रा वाघ, माजी आमदारअशोक धवड, सुनील शिंदे, राजेंद्र काळमेघ, तानाजी वनवे, जयंत दळवी, मधुकरराव मेहकरे, दिलीप खोडके, सुरेंद्र नाकाडे, श्याम डहाके, देवलाल कोरडे, दिलीप मिर्झापुरे, मंगेश मस्के, अभिजित भुईभार, राजे संग्रामसिंग भोसले, जयंत खडतकर, अतुल लोंढे, दिलीप जाधव, पंकज निंबाळकर, सचिन गुडधे, अभिजित सपकाळ, प्रेमलता जाधव, सुनिता जिचकार, सोनाली दळवी, जया देशमुख, अनिता ठेंगरे, सुष्मा साबळे व लीना निकम आदींनी भाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.